
नवी दिल्ली : भारतावर काँग्रेसने आणीबाणी लादली. ही आणीबाणी देशात लागू करण्याचा निर्णय ज्या दिवशी झाला त्या दिवसाला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्या काळात नागरिकांना स्वतःचे विचार कोणत्याही प्रकारे जाहीरपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. काँग्रेसने आणीबाणी लादून लोकशाहीची हत्या केली होती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये मोदी म्हणतात, आज देशात आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यानंतर देशात असे वादळ उठले, ज्याचा सामना प्रत्येक भारतीयाला करावा लागला. आणीबाणीचा तो काळा अध्याय अजूनही लोकांच्या मनात एका दुःस्वप्नासारखा जिवंत आहे. इतिहासही तो काळा अध्याय कधीही आपल्या पानांवरून पुसून टाकू शकणार नाही; अशी एक्स पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, भारतात आणीबाणी लागू झाली तो काळ देशाच्या इतिहासातील काळ्या अध्यायांपैकी एक आहे. भारतीय नागरिक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळतात. या दिवशी भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूल्यांना बाजूला ठेवून मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले. इतकेच नाही तर प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. सत्ताधीश काँग्रेसने लोकशाहीला ओलीस ठेवले होते.
आणीबाणीवरील पुस्तक
आणीबाणीच्या काळातील पंतप्रधान मोदींचे अनुभव आणि किस्से संकलित करुन ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने पुस्तक स्वरुपात सादर केले आहेत. या पुस्तकासाठी प्रस्तावना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी लिहिली आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा हे पण आणीबाणीचे विरोधक होते. यामुळे आणीबाणी विरोधी चळवळीतल्या नेत्याने पुस्तकाला प्रस्तावना दिली म्हणून पंतप्रधान मोदींनी देवेगौडा यांचे विशेष आभार मानले आहेत.




















