पंकजाताई मुंडेंचा गुजरात निवडणूकीत झंजावती प्रचार दौरा

0
45

तळागाळातील लोकांची कामे केल्याने गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता; कालोल, गोधराच्या प्रचारसभेत व्यक्त केला विश्‍वास

मुंबई । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या झंजावती प्रचार दौर्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणकारी योजना थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्याने गुजरातमध्ये पुन्हा मोदींचीच सत्ता येणार असल्याचा दृढ विश्‍वास त्यांनी प्रचार सभांमधून व्यक्त केला. मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन पंकजाताईंनी कालोल, गोधरा येथील सभेत बोलतांना केले.
केंद्रीय स्तरावरील भाजपचे नेते सध्या गुजरात राज्यात प्रचार दौर्यावर असून त्याचाच एक भाग म्हणून पंकजाताई मुंडे हया देखील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी मुंबई हून विमानाने गुजरातला रवाना झाल्या. अहमदाबाद विमानतळावर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.
कालोल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार फत्तेसिंह चौहान तर गोधरा येथील उमेदवार सी. के. राहूल यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांच्या उत्स्फूर्त जाहीर सभा झाल्या. या सभांना मतदारांनी मोठी गर्दी केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे तसेच स्वतः उमेदवार व स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरात आज विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकांचे राज्य बनले आहे. भारताची व राज्याची संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेपासून ते थेट अंतराळापर्यंत भारताच्या प्रगतीत मोदींच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यांनी जनतेसाठी आखलेल्या व अंमलात आणलेल्या कल्याणकारी योजनांचा फायदा तळागाळातील दुर्बल, वंचित घटकांपर्यंत पोचला आहे. गरीबातला गरीब माणूस भाजपला बहुमत देऊन पुन्हा एकदा गुजरातमध्ये त्यांचीच सत्ता आणणार आहे असा मला विश्‍वास आहे. मोदींचे हात बळकट करणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून विजयी करावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना यावेळी केले. या दौऱ्यात पंकजाताईंनी ठिक ठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here