Home Central Vista उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेगात; 18 ऑगस्टला विरोधी आघाडीची बैठक

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेगात; 18 ऑगस्टला विरोधी आघाडीची बैठक

0
70
  • भाजपकडून थावरचंद गेहलोत प्रबळ दावेदार

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी विरोधी आघाडी ‘इंडिया’चे नेते 18 ऑगस्ट रोजी भेटण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्कात असून, उमेदवार निश्चितीसाठी सल्लामसलत सुरू आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट असून, 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता.

भाजपची तयारी – थावरचंद गेहलोत आघाडीवर
भाजप या पदासाठी आपल्या विचारसरणीशी निष्ठावंत आणि अनुभवी कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. सध्या कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात असून, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर यांचे नावही चर्चेत आहे. एनडीएच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, उमेदवाराची निवड करताना अनुभव, उंची आणि जातीय समीकरण या घटकांना प्राधान्य दिले जाईल, कारण विरोधी पक्ष देखील एक मजबूत उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे.

संसदेत एनडीएकडे बहुमत
लोकसभेतील 542 सदस्यांपैकी एनडीएकडे 293 आणि इंडिया आघाडीकडे 234 सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत एनडीएला सुमारे 130 तर इंडिया आघाडीला 79 सदस्यांचा पाठिंबा आहे. एकूणच, एनडीएकडे 423 आणि इंडिया आघाडीकडे 313 खासदारांचा पाठिंबा आहे.

थावरचंद गेहलोत – अनुभवसंपन्न नेता
77 वर्षीय थावरचंद गेहलोत हे मध्य प्रदेशातील असून, ते राज्यसभेत सभागृहाचे नेते आणि केंद्रीय मंत्रीपद भूषवले आहेत. भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य राहिलेले गेहलोत जातीय समीकरणात (दलित) बसतात आणि प्रशासकीय अनुभवसंपन्न आहेत.

ओम माथूर – संघाशी जवळीक
73 वर्षीय ओम माथूर हे राजस्थानचे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे निवडणूक प्रभारी होते. त्यांना मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जाते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत.

उपराष्ट्रपती निवड प्रक्रिया – टप्प्याटप्प्याने

  1. इलेक्टोरल कॉलेज – लोकसभा व राज्यसभेतील सर्व निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश.

  2. अधिसूचना – निवडणूक आयोग नामांकन, मतदान व निकालाची तारीख जाहीर करतो.

  3. नामांकन प्रक्रिया – उमेदवाराला 20 खासदार प्रस्तावक व 20 खासदार अनुमोदक म्हणून आवश्यक.

  4. प्रचार – फक्त खासदारांमध्ये प्रचार.

  5. मतदान – खासदार पसंतीच्या क्रमाने मत नोंदवतात.

  6. मतमोजणी व निकाल – साधे बहुमत मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here