Home Gate Way OF india महसूलमंत्री बावनकुळे आक्रमक; परिवहन विभागाला धरले धारेवर

महसूलमंत्री बावनकुळे आक्रमक; परिवहन विभागाला धरले धारेवर

0
44
  • नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बस आणि टॅक्सी चालकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश

​मुंबई : उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्याला अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप-बेस्ड टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज परिवहन विभागाला चांगलेच धारेवर धरले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या या बैठकीत बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत नागपूरकरांच्या आणि चालकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले.

नागपूरला उपराजधानीचा दर्जा असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याचा मुद्दा महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांनी उचलून धरला. “नागपूरला जादा एस टी बसेस का दिल्या जात नाहीत?” असा थेट सवाल करत त्यांनी परिवहन विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपराजधानी म्हणून नागपूरला प्राधान्याने अतिरिक्त बस देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
​या बैठकीत ॲप-बेस्ड टॅक्सी चालकांच्या विविध मागण्यांवरही चर्चा झाली. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभाग येथील अनेक वर्षांपासून चालक पदाची बिंदू नामावली (Roster) तयार करण्यात आलेली नाही, यावर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारात तातडीने बिंदू नामावली निश्चित करण्याचे आदेश दिले. “चालकांची बिंदू नामावली तातडीने तयार करून द्या, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी सूचना दिल्या. तसेच, अनुकंपा तत्त्वावरील १७ प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.

​परिवहन विभागाचे कंट्रोलर फिल्डवर न राहता कार्यालयात बसून राहत असल्याच्या तक्रारींवरून बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला. “कंट्रोलर फिल्डवर असले पाहिजेत, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा,” असे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच, शहरात आरटीओ कार्यालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.

​महसूलमंत्री बावनकुळे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे सांगितले. या बैठकीमुळे आता नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न आणि टॅक्सी चालकांच्या मागण्या लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here