नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे येथील एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू केले, मात्र सिंह यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मनमोहन सिंह यांनी सलग दोन वेळा म्हणजे तब्बल 10 वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवले. त्यांनी 2004 ते 2014 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे त्यांनी नेतृत्व केले. त्याआधी पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी 1991-96 या काळात अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे.
नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भारताने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण स्वीकारले. या सुधारणांचे प्रमुख शिल्पकार म्हणून मनमोहन सिंह यांना श्रेय दिले जाते. 1990 च्या काळात देश आर्थिक डबघाईला आला होता. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची ओळख अर्थतज्ज्ञ म्हणून देशाला झाली.
मनमोहन सिंह यांचा जन्म आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमधल्या गाह येथे 1932 मध्ये झाला. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रीज विद्यापीठातून अर्थशास्त्रातील शिक्षण पूर्ण केले. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना भारताचे तत्कालिन विदेश आणि व्यापार मंत्री ललित मिश्रा यांची मनमोहन सिंह यांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.
त्यांच्या निधनावर मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. असा नेता होणे नाही, या शब्दात शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दरम्यान, कर्नाटकातल्या बेळगावी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन सुरू होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे तेथील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. राहुल गांधी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते नवी दिल्लीकडे रवाना झाले.