सपकाळांचे वक्तव्य आगीत तेल ओतणारे! आमदार संदीप जोशी आक्रमक

0
9
सपकाळांचे वक्तव्य आगीत तेल ओतणारे!

आमदार संदीप जोशी आक्रमक : पोलिसांत करणार तक्रार

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना यात्रेच्या निमित्ताने नागपुरात संघ मुख्यालय आणि रेशीमबाग संदर्भात केलेले वक्तव्य हे आगीत तेल ओतणारे आहे. रेशीमबागचे कुलुप तोडायला ते येतील आणि आम्ही काय हातात बांगड्या घालून बसणार आहोत का? असा सवाल करीत सपकाळ यांच्याविरुद्ध आपण पोलिसांत तक्रार करणार असल्याचे आमदार संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

नागपुरात झालेल्या दंगलीला एक महिन्याचा कालावधी उलटला. काँग्रेसला आता जाग आली. खोटी सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करीत काँग्रेसने तब्बल एक महिन्यानंतर नागपुरात काढलेली सद्भावना यात्राच हास्यास्पद आहे, असे म्हणत आमदार संदीप जोशी यांनी पूर्वीपासून काँग्रेसच्या सद्भावना यात्रेसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, यात्रेच्या समारोप कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले वक्तव्य अत्यंत भडकाऊ आणि मुस्लीम समाजाला संघ मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगवार स्मृतिस्थळावर हल्ला करण्यास प्रोत्साहन देणारे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ‘आपण कुठली सद्भावना घेऊन आला आहात? दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून नागपूरचे शांती आणि सौहार्दाचे वातावरण आपण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहात. आपल्यात दम असेल तर संघ कार्यालयावर येऊनच दाखवा. आपल्यासाठी संघ स्वयंसेवकच पुरेसा आहे,’ या शब्दात आमदार संदीप जोशी यांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाच दम दिला. काँग्रेसला काही करायचे असते तर तेव्हाच केले असते. पोलिसांनी दंगल केवळ चार तासात आटोक्यात आणली. समाजकंटकांना ताब्यात घेतले. शासनाने तातडीने कठोर पावले उचलली. असे असताना आता एक महिन्यानंतर काँग्रेसला अचानक कशी काय जाग आली? यामागे काय हेतू आहे? असे सवाल आ. जोशी यांनी उपस्थित केले.

एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतानाच नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे मात्र आमदार संदीप जोशी यांनी अभिनंदन केले आहे. नागपूरच्या दंगलीसंदर्भात त्यांनी कुठलेही प्रक्षोभक वक्तव्य केले नाही. त्यांची भूमिका नेहमीच सौहार्दाची आणि सहकार्याची राहिली असल्याचे आ. जोशी यांनी म्हटले आहे.

आम्ही आता चूप बसणार नाही. ही बेबंदशाही खपवून घेणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या बेताल वक्तव्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती आ. संदीप जोशी यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here