नागपूर/मुंबई : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची बातमी धक्कादायक आणि दुःखद आहे. देशाच्या आर्थिक उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. यावेळी देशाचा कोहिनूर हिरा हरपल्याचे सांगून काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक व्यक्त केला.
सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका देणारी ही बातमी आहे.
ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित होते. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतले होते. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले.
मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.
भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेले मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.