धनुष्यबाण आणि घड्याळ सोबत घेऊनच निवडणूक लढवू : भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे विधान

0
45

धनुष्यबाण आणि घड्याळ सोबत घेऊनच निवडणूक लढवू

  • भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे विधान

नागपूर, ता. 24 : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी पूर्णविराम दिला. धनुष्यबाण आणि घड्याळ सोबत घेऊनच महायुती निवडणुकीला समोर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आजोजित भाजप कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूर विभागातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यानासुद्धा कुठलाही भेदभाव न करता तसेच मनात किंतू परंतु न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.

महायुती विशेषतः अजित पवार विधानसभेत एकत्रित लढेल की नाही याविषयी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका कायम होती. अमित शहा यांनी आम्ही सर्व एकत्रच लढणार असल्याचे जाहीर केल्याने आता शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

यावेळी अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याच उमेदवारासाठी काम करायचे आहे, यात कुठलीही शंका नाही. बंडखोरी कदापिही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, आपलं लक्ष्य पवार आणि ठाकरेंना रोखणं आहे. विदर्भ जिंकला म्हणजे महारष्ट्र जिंकला. त्यामुळे विदर्भातील ६२ पैकी ४५ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील यादृष्टीने नियोजन करा, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. महायुती शासनाने अनेक चांगले निर्णय घेतले. त्याचा फायदा या निवडणुकीत नक्कीच होणार आहे. शासनाचे निर्णय आणि योजना या नागरिकांपर्यंत पोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here